पुणे – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवरून पुण्यात महाविकास आघाडीत “मिठाचा खडा’ पडला आहे. एका बाजूला कॉंग्रेसने मंगळवारी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर, शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कसब्यातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. “या निवडणुकीबाबत कॉंग्रेस पद्व गंभीर नसल्याने शहरातील सक्षम विरोधीपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे असल्याने हा निर्णय घेतला,’ असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जगताप यांनी हा निर्णय पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळवल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (ठाकरे) संपर्क प्रमुखांनीही रविवारी याबाबत बैठक घेतली होती. त्यात “कसब्याची जागा कॉंग्रेसला जाणार असेल, तर शिवसेनेची ताकद कॉंग्रेसपेक्षा अधिक आहे. कॉंग्रेसने उमेदवार दिल्यास आपणही उमेदवार द्यावा’ अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यास पक्षाने त्यास होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता हा वाद न मिटल्यास कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी- शिवसेना (ठाकरे) गट आणि कॉंग्रेस हे चारही पक्ष रिंगणार असण्याची चिन्हे आहेत.
कॉंग्रेसने घेतल्या मुलाखती
कसबा पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून 16 जण इच्छूक आहेत. या सर्वांच्या मुलाखती पक्षाचे निवडणूक प्रभारी तथा आमदार संग्राम थोपटे यांनी ऑनलाइन घेतल्या. थोपटे यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, विजय तिकोणे, आरिफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषिकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुलाखती दिल्या. यातील तिवारी यांनी घरूनच मुलाखत दिली, तर उर्वरित उमेदवारांनी कॉंग्रेस भवन येथे जाऊन ऑनलाइन मुलाखत दिली. यादरम्यान निवडणूक कशा पद्धतीने लढविली पाहिजे, याबाबत इच्छुकांनी आपापले मत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. शिवाय, मतदारसंघाची सद्यस्थिती काय? भाजपला मतदारसंघात कशा प्रकारे पराभूत करता येईल? तुम्ही निवडून येण्यासाठी काय केले आहे? असे प्रश्न विचारण्यात आल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले. या मुलाखतीनंतर संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केली जाणार आहे.
प्रशांत जगताप म्हणाले…
पक्षाच्या बैठकीबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “कसबा विधानसभेची जागा ही 1999, 2004 आणि 2009 मध्येही आमच्याकडे होती. मात्र, कॉंग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आग्रहास्तव आम्ही ही जागा कॉंग्रेसचे उमेदवार रोहीत टिळक यांच्यासाठी सोडली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून कॉंग्रेस ही निवडणूक गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुका लक्षात घेता सध्याचा सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून ही निवडणूक आम्ही लढविणार आहोत. पक्षाला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची भूमिका कळविण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून पक्षप्रवक्ते माजी आमदार अण्णा थोरात, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, ऍड. रुपाली ठोंबरे, वनराज आंदेकर, शिल्पा भोसले, गोरख भिकुले, दत्ता सागरे, गणेश नलावडे हे इच्छूक असल्याचे जगताप यांनी सांगितले.