बर्लिन – अनेक आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर युक्रेनला रशियाविरोधातील युध्दासाठी लेपर्ड-2 रणगाडे देण्याची तयारी जर्मनीने दर्शवली आहे. जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ यांनी याबाबतची घोषणा केली.
युक्रेनला लीपर्ड-2 ए 6 रणगाड्यांची एक कंपनी देण्यात येणार आहे. या एका कंपनीमध्ये 14 रणगाडे असणार आहेत. युक्रेनला जर्मनी आणि युरोपातील अन्य देशांकडून दोन बटालियन किंवा 88 रणगाडे देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील आपल्याला शक्य असलेल्या रणगाड्यांची उपलब्धता स्चोल्झ यांनी आज जाहीर केली. आता अन्य देशांकडूनही युक्रेनला रणगाडे उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेनेही युक्रेनला रणगाडे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. अमेरिकेकडून एम 1 अबराम रणगाडे युक्रेनला दिले जाणार आहेत.त्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. युक्रेनला रणगाडे देण्याच्या अमेरिकेच्या कटिबद्धतेच्या ठाम हमीनंतरच जर्मनीकडून रणगाडे देण्याची घोषणा केली जाणार होती.
Republic Day 2023 : प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी 9.15 वाजता होणार शासकीय ध्वजारोहण
रशियाकडून जोरदार आक्षेप
युक्रेनला जर्मनी आणि अमेरिकेकडून रणगाडे दिले जाण्याच्या निर्णयावर रशियाने जोरदार आक्षेप घेतला आहे. हा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. ही कल्पना अतिशय मूर्खपणाची आहे. रशियाच्या मुकाबल्यासाठी शस्त्रे पाठवण्यासारखीच रणगाडे पाठवणे फायद्याचे होईल, हा एक भ्रम आहे. युक्रेनच्या मदतीसाठी पाठवले जाणारे हे रणगाडे इतर रणगाड्यांप्रमाणेच जळून जातील, असे पेस्कोव्ह म्हणाले. या रणगाड्यांचा आर्थिक भार युरोपातील करदात्यांवरच पडेल. असेही पेस्कोव्ह म्हणाले.