मुंबई – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची स्पीड बोट भर समुद्रात बंद पडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी उदय सामंत एका कार्यक्रमानिमित्त अलिबागला गेले होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला परत येताना ही थरारक घटना घडली आहे. यावेळी सामंत अलिबाग ते मुंबई असा प्रवास स्पीड बोटीने करत होते.
समुद्रात प्रवासा दरम्यान त्यांच्या स्पीड बोटीचे इंजिन अचानक बंद पडले. समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली. बंद पडलेल्या स्पीड बोटीच्या सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठिण झाले होते.
मात्र, कॅप्टनने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अखेर दुसरी बोट मागवण्यात त्यांना यश आले. कशीबशी बोट आली आणि सामंतांसह त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यात शिफ्ट झाला. यासोबतच बुडणाऱ्या बोटीलाही वाचवण्यात आले. दरम्यान, या संपूर्ण घटनेत कोणतीही हानी झाली नसून, सर्वजण सुखरूप बाहेर पडल्याचं सांगण्यात आलं आहे.