मुंबई – महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पात 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीने महाराष्ट्र सरकारला सादर केलेल्या प्रकल्पाला सरकारने परवानगी दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी राज्याने सुरू केलेल्या औद्योगिक प्रोत्साहन या योजनेअंतर्गत ही परवानगी दिली आहे. यासंदर्भात बुधवारी जागतिक आर्थिक मंच येथे संबंधित करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हि गुंतवणूक पुढील सात ते आठ वर्षाच्या काळात करण्यात येणार असून या ठिकाणी बॉर्न इलेक्ट्रिक व्हेईकल्स तयार करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात महिंद्रा कंपनीतील वाहन विभागाचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर यांनी सांगितले की, महिंद्रा 70 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. महाराष्ट्रात या कंपनीचे अनेक ठिकाणी प्रकल्प आहेत. आपल्या कामकाजाच्या विस्ताराचा भाग म्हणून आता पुण्यातील प्रकल्पात आधुनिक इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यात येणार आहेत.
ते म्हणाले क, महाराष्ट्र सरकार उद्योग धंदा करणे सोपे व्हावे यासाठी विविध योजना तयार करीत आहे. महिंद्राच्या या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे केंद्र होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे देशातील आणि परदेशातील इतर इलेक्ट्रिक वाहन कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत होऊ शकतील असे त्यांनी सांगितले.