चंदीगड – काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. कडेकोट बंदोबस्तात राहुल गांधी यात्रेत फिरत आहेत. अशात त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राहुल गांधी पगडी घालून गुरुद्वारात पोहोचले आहे. त्यांच्यासोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत, यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. राहुल गांधींचा प्रवास दिल्ली, यूपी आणि हरियाणामार्गे पंजाबमध्ये पोहोचला आहे.
पंजाबच्या भूमीवर प्रवास सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी गुरुद्वारा फतेहगढ साहिब येथे दर्शन घेतले. तत्पूर्वी मंगळवारी ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात गेले होते. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधी मुस्लिम समाजाच्या लोकांसोबत हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. राहुल गांधींचा पगडी घातलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की,’देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक देशाचे विभाजन करत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते पगडीबाबत अनेक गोष्टी बोलताना दिसत होते. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी हल्लाबोल केला होता.’