पिंपरी -शहरातील थकीत मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तुरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत, त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहे. मात्र, एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल तर संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरूवार (दि.12) रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, विशेष कार्यकारी अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते. शहरात 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत 565 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा झाला आहे. 1 लाख 62 हजार निवासी मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मिळकतकरांची 480 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहीमेसह, नळजोड तोडण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.
काही थकबाकीदारांसाठी संपूर्ण सोसायटीचे नळजोड तोडणे योग्य आहे का? याबाबत आयुक्त म्हणाले, मालमत्ता कर न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तरतूद आहे. एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल तर संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
करोना वाढल्यास बेडची तयारी
सध्यस्थितीत शहरात करोना रूग्णांची संख्या कमी आहे. मात्र, सरकारच्या वतीने खबरदारी घेण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार करोना रूग्णांसाठी आकुर्डीतील नवीन रूग्णालयात बेड, आयसीयूची तयारी करण्यात आली आहे. गरज पडल्यास नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव रूग्णालयातही बेड उपलब्ध करण्यात येतील. तसेच आठ रूग्णालयात लसीकरणाची मोहीमही सुरू असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
30 जूनपूर्वी कामे पूर्ण करणार
पिंपरी-चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. मात्र, त्यानंतरही स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र, जूनपूर्वीच स्मार्ट सिटीतील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर असणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.