पिंपरी – पिंपरी कॅम्पात अतिक्रमण कारवाईवेळी व्यापारी आणि महापालिकेच्या अतिक्रमण पथकाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. पथकातील कर्मचारी दुकानातीलही साहित्य उचलत असल्याचा आक्षेप व्यापाऱ्यांनी घेतला. कर्मचाऱ्याने काठीने मारहाण केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बाजारपेठ बंद ठेवली तसेच शगुन चौकात दोन ते अडीच तास ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार गुरूवार (दि.12) रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला.
दरम्यान, फुटपाथवर असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करणारच अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे. पिंपरी कॅम्प ही शहरातील मोठी बाजारपेठ आहे. शहर आणि शहर परिसरातील नागरिक कॅम्पात खरेदीसाठी येतात. कॅम्पातील अतिक्रमणाबाबत सातत्याने ओरड असते. महापालिकेचे अतिक्रमण पथकाने गुरूवारी पिंपरी कॅम्पात कारवाई सुरु केली. अधिकाऱ्यांनी दुकानाबाहेरील साहित्य उचलले. त्याला आमचा आक्षेप नाही. पण, दुकानामधीलही साहित्य उचलले जात असल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला. त्यामुळे वादावादी झाली.
दरम्यान, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याने काठीने मारहाण केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुन कारवाईचा निषेध केला. शगुन चौकात एकत्र येत व्यापाऱ्यांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे कॅम्पातील वातावरण काही काळ तणावपूर्ण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी अधिकची कुमक मागविली होती. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनामुळे शगुन चौकापासून ते पिंपरी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण, व्यापारी ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. ज्या अधिकाऱ्याने मारहाण केली. त्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर व्यापारी ठाम होते. क्षेत्रीय अधिकारी सुचित पानसरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची भेट घेत चर्चा केली.
पिंपरी कॅम्प शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे कॅम्पात नेहमी गर्दी असते. अनेक दुकानांबाहेर फुटपाथवर विक्रेते बसलेले असतात. किंवा काही दुकानदार साहित्य बाहेर ठेवतात. त्यामुळे नागरिकांना अडचण होते. त्यामुळे कॅम्पात अतिक्रमणची गुरूवारी कारवाई करण्यात आली. कारवाईस पथक आले की अनेक दुकानदार बाहेर ठेवलेले साहित्य आत ठेवतात. त्यामुळे वादा-वादीचे प्रसंग घडतात. मात्र, पथकातील कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याला मारहाण केली की नाही याचा व्हिडीओ पाहून निर्णय घेऊ. तसेच फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या आणि साहित्य ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त