नगर – राज्य परिवहन महामंडळाने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेत नगर जिल्ह्यात मात्र अडचणी वाढल्या आहेत. कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेली असताना येथे मात्र नोंदणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. आता तर मागील नऊ महिन्यांपासून नोंदणीच बंद असल्याची माहिती मिळत आहे. तांत्रिक अडचणींमुळे स्मार्टकार्डसाठी सध्या नोंदणी होत नसल्याचे नगर विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवास सवलतींसाठी स्मार्ट कार्ड दिले जात आहे. यासाठी आगार पातळीवर नोंदणी केली जात आहे. सध्या या कार्यवाहीत अडचणी येत आहेत. सध्या तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या योजनेत प्रवाशांना डिजिटल स्वरुपात कार्ड देण्यात येत आहे.
त्यामुळे कागदी पास सांभाळण्याचा त्रास वाचला आहे. कार्ड रिचार्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे कार्ड आधारकार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्यामुळे जन्म तारखेवरून प्रवासी व वाहकांत नेहमी होणारे वाद टळण्यास मदत होणार आहे. तसेच कार्ड डिजिटल स्वरुपात असल्याने यामध्ये फेरफार होण्याचीही शक्यता नाही. या स्मार्टकार्डचे असे अनेक फायदे आहेत. मात्र, या प्रकल्पात अडचणी वाढल्या आहेत. नोंदणीतही अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.
स्मार्ट कार्ड नावनोंदणीला मिळाली मुदतवाढ
राज्यात अजूनही एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना या कार्डचा फायदा होणार आहे. त्यासाठी प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. मात्र, बऱ्याचदा नावनोंदणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. काही वेळेस तर नोंदणी बंदही करावी लागते. तसेच खासगी केंद्रांकडूनही नोंदणी करावी लागते. या ठिकाणी तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तच त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे महामंडळाने या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे. आता नावनोंदणीसाठी आणखी मुदतवाढ मिळाली आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी महामंडळाकडूनही प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात यातील अडचणी कमी होऊन प्रवाशांचाही त्रास कमी होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.