मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अमृता फडणवीसांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत गाणे गायले आहे. त्यांचे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले आहे. याच मुद्दयावर बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत ट्रोल करणारी लोक विरोधी पक्षातील असल्याचे म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत, त्यांच्यावर बोलण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही, त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात, असे खळबळजनक वक्तव्य अमृता फडणवीसांनी केले.
विरोधकांच्या टीकेल अमृता फडणवीस यांनी सडेतोड उत्तर देताना म्हणाल्या, “जेव्हा नेत्यावर बंदूक ताणण्यालायक काही दिसत नाही किंवा त्यांच्यावर बोट उचलण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधक तेच करत आहेत. त्यांनी माझ्या या गाण्यालाही सोडलं नाही, ते ठीक आहे. पण त्यांनी माझ्या भजनालाही ट्रोल केलं. देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय पदामुळे हे केलं जातंय, हे मला माहीत आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे. मी सातत्याने माझं काम करत आहे, याचा मला आनंद आहे. माझ्या गाण्याला लोकांची पसंतीही वाढत आहे,” असं विधान अमृता फडणवीस यांनी केले.
“स्त्री ही एक शक्ती आहे आणि स्त्री शक्तीसाठी लवकरच माझं नवीन गाणं येत आहे. ते गाणं मी म्हणणार आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे गाणं मी प्रदर्शित करणार आहे”, अशी माहितीही अमृता फडणवीसांनी दिली.