औरंगाबाद : एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा वाढदिवस असला तर शहरातील चौकाचौकात लागणारी होर्डिंग लागलेली आपण नेहमी पाहतो. तुम्ही एखाद्या रेड्याच्या वाढदिवसाचे होर्डिंग पहिले आहे का?..होय असा वाढदिवस नुकताच साजरा झाला आहे. त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात सुरु आहे. कारण एखाद्या नेत्याला किंवा सेलिब्रिटीला लाजवेल असा वाढदिवस चक्क रेड्याचा साजरा करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये हा अजबगजब वाढदिवस साजरा झाला आहे. ‘सूरज’ असे या रेड्याचे नाव असून, या रेड्याच्या वाढदिवसाला सर्व शहरात होर्डिंग लावत तब्बल 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. औरंगाबादचे शंकरलाल पहाडिया यांच्याकडे असलेला नागपूर हेटी प्रजातीचा सुरज रेडा यंदा दोन वर्षांचा झाला आहे. आपल्या मुलाप्रमाणे पहाडिया यांनी सूरजचा सांभाळ केला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील सुरजवर सतत जिवापाड प्रेम केले. त्यामुळे सूरजचा वाढदिवसही देखील अविस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पहाडिया कुटुंबातील सदस्यांनी घेतला. 6 जानेवारीला सूरजचा वाढदिवस असल्याने महिन्याभरापूर्वीच त्याची तयारी सुरु झाली होती.
सूरजचा दुसरा वाढदिवस अविस्मरणीय पद्धतीने साजरा होणार असल्याने शहरात त्याच्या वाढदिवसाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी होर्डिंग लावण्यात आले होते. या हटके वाढदिवसाच्या होर्डिंगमुळे शहरात जोरदार चर्चा सुरु झाली. तर वाढदिवसासाठी थेट नांदेड व जालन्यातून 50 पाहुणे आले होते.
आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणात व्हेज पुलाव, बिर्याणी कचुंबर तयार करण्यात आला होता. यावेळी एकूण 700 च्या जवळपास पाहुण्यांना जेवणावेळसुद्धा देण्यात आली. तर सुरज माझ्यासाठी मुलापेक्षा कमी नाही. त्यामुळे त्याचाही मुलाप्रमाणे आणि त्यापेक्षा देखील अधिक चांगला करण्याचा ठरवत हा वाढदिवस साजरा केल्याचं शंकरलाल पहाडिया म्हणतात.