फूस पेन्ह, (कंबोडिया) : कंबोडियातील एका कसिनो हॉटेलला लागलेल्या आगीमध्ये किमान 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 पेक्षा अधिक लोक या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्यांचा नेमका आकडा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास 12 तासांपेक्षा अधिक कालावधी लागला होता.
या आगीचे स्वरुप इतके मोठे होते की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारील थायलंडमधून आगीचे बंब मागवावे लागले होते. कंबोडियाच्या सीमाभागातील पोयपेट प्रांतामध्ये ही आग लागली होती. आगीमुळे कसिनो हॉटेलचा मोठा भाग कोसळला आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तसेच हॉटेलच्या काही खोल्या आगीच्या काळात उघडल्या जाऊ शकल्या नव्हत्या.
खोल्यांमध्येही काही जण अडकले असल्याची शक्यता बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात येते आहे. या खोल्यांमध्ये काही जखमी असण्याची शक्यता आहे, असे बेअंते मेंचेय प्रांताच्या माहिती विभागाच्या अदिकाऱ्याने सांगितले. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींमध्ये चीन, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम आणि कंबोडियाच्या नागरिकांचा समावेश आहे.
शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज…
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही आग पेटली. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. नव्या वर्षांच्या स्वागतासाठी संपूर्ण हॉटेलवर रोषणाई करण्यात येते आहे.
US winter Storm : अमेरिकेतल्या हिमवादळामुळे दगावलेल्यांची संख्या 62 वर
या रोषणाईसाठी वीजेचा अतिरिक्त वापर करण्यात आला. त्यामुळे वीजेचा अतिभार निर्माण झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.