नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. आतापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे 490 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 24 हजारांहून अधिक जणांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
या समस्यांतून बाहेर पाडण्यासाठी अमेरिका चीनच्या मदतीला धावली आहे. बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी अमेरिका चीन बरोबर आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जगासाठी चिंतेचा विषय आहे. हा विषाणू जगभरात पोहचला असून, या विषाणूशी लढण्यासाठी सर्वानी चीनला मदत करायला हवी. अमेरिकन प्रशासन चीनला सर्वोतपरी मदत करेल अशी ग्वाही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.
अमेरिकेने 300 नागरिकांना काढले चीनमधून बाहेर
मंगळवारी अमेरिकेने चीनच्या वुहानमधून 300 अमेरिकन नागरिकांना बाहेर काढले आहे. या विषाणूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव वुहान प्रांतात झाला आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनमधून 195 नागरिकांना बाहेर काढले होते.
मंगळवारी या विषाणूमुळे एका दिवसात 65 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू 20 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. अनेक देशांनी चीनमध्ये विमान प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विषाणूमुळे चीनबाहेरील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा हाँगकाँगमध्ये तर, एकाचा फिलिपिन्समध्ये मृत्यू झाला आहे. तसेच भारत, अमेरिका, थायलंड, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, तैवान, व्हिएतनाम, मकाऊ, नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, यूके, इटली, रशिया, फिनलँड, स्पेन, युएई, स्वीडन आदी देशामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.