राजेंद्र मोहिते
कराड – कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने, तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपापले गड राखल्याचे दिसून आले. दक्षिणेत काही ठिकाणी काका-बाबा गटाने सत्ता मिळवली. तर उत्तरेत आ. बाळासाहेब पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या निवडणुका या आगामी बाजार समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या. यामध्ये बऱ्याच ठिकाणी विविध पक्षांच्या मिळून बनलेल्या स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. तर काही ठिकाणी जनतेने धक्कादायक कौल देत सत्तांतरही घडविण्याचे दिसून आले. त्यामध्ये दक्षिणेतील अत्यंत महत्त्वाच्या वडगाव हवेली, आटके, कोरेगाव ग्रामपंचायतींसह उत्तरेतील किवळ, पाडळी, जुने कवठे व तळबीड सारख्या महत्वाच्या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. हा निकाल आगामी बाजार समितीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिणेत काका-बाबा गटाने एकत्रितरित्या येळगाव, कासारशिरंबे, मनव, तारुख आणि ओंडोशी ग्रामपंचायत ताब्यात घेतली. यामध्ये प्रामुख्याने येळगाव आणि मनवमध्ये उंडाळकर गटाचे प्राबल्य आहे. तर उत्तरेतही काका-बाबा गटाने कवठे व तळबीडमध्ये सत्तांतर घडवत हिंगनोळेमध्ये कॉंग्रेसची सत्ता कायम ठेवली आहे. तर दक्षिणेत कोरेगावमध्ये कॉंग्रेसची पीछेहाट झाली असून याठिकाणी आ. बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले गटाने सरपंचपदासह आठ जागा जिंकत सत्ता मिळवली. तसेच कुसुर व तर वनवासमाचीत (खोडशी) काका व भोसले गटाने सत्ता मिळाली आहे.
तर उत्तरेत किवळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्तांतर घडवत सरपंच पदासह सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. पाडळीतही (हेळगाव) राष्ट्रवादीने सत्तांतर घडवून 9/1 असा दणदणीत विजय मिळवला. तसेच आंतवडीमध्ये 6/2 अशा फरकाने राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम ठेवली असून कालगाव व यशवंतनगर ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडेच राहिली आहे. तर घोलपवाडीत सर्व सदस्य बिनविरोध झाल्याने याठिकाणी केवळ सरपंच पदासाठी झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. तसेच कवठे ग्रामपंचायतीत काका-बाबा गटाच्या महिला सरपंच विजयी झाल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच दक्षिणेत व उत्तरेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापले गड राखले आहेत.
भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका
भाजपने दक्षिणेतील वडगाव हवेली या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवून महाविकास आघाडीचा पराभव केला. तर जुळेवाडी व दुशेर ग्रामपंचायतीतही मोठे यश मिळवले. परंतु, तितक्याच महत्त्वपूर्ण असलेल्या दक्षिणेतील आटके, रेठरे खुर्द व कासारशिरंबे ग्रामपंचायतीत मात्र भाजपला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका मिळाल्याचे दिसून आले. स्थानिक पातळीवर दोन भोसले गट एकमेकांविरोधात उभे टाकले होते. परिणामी याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे दिसून आले.
शिंदे गटाच्या हाती निराशा
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाने पाटण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेली दक्षिण तांबवे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवले. शिंदे गटाच्या या विजयाचा मोठा गवगवाही झाला. त्यामूळे दुसऱ्या टप्प्यातही या भागात शिंदे गट मोठी बाजी मारणार असल्याची चर्चा होती. परंतु, येथील महत्वपूर्ण असलेल्या सुपने व पश्चिम सुपने ग्रामपंचायतीत मात्र शिंदे गटाच्या हाती मोठी निराशा आल्याचे दिसून आले. याठिकाणी राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.