नागपूर – राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे सत्ताधारी पक्षाने त्यांच्या निलबंनाची मागणी करत सभागृहात मोठा गदारोळ केला. त्यानंतर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. सोमवार (दि. 19) पासून सुरु झालेल्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कामकाजादरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. नागपुर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. दरम्यान, शुक्रवार (दि. 30) पर्यंत हे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु राहणार आहे. … माहिती अपडेट होत आहे…