मुंबई – फिफा विश्वचषक विजेत्या लिओनेल मेस्सीच्या नावाचा सध्या जगभरात डंका सुरु आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करत तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वविजेता बनण्याचा मान मिळवला. स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात परतताच मेस्सीसह संपूर्ण संघाचे मोठ्या धूम धडाक्यात स्वागत करण्यात आले. या विजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसले. दरम्यान, मेस्सी आणखी एका वृत्तामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अर्जेंटिना सरकार तेथील नोटांवर मेस्सीचा फोटो लावण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.
अर्जेंटिना सरकारने नोटांवर मेस्सीचा फोटो लावण्याचा निर्णय आमलात आणल्यास इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विश्वचषक विजेत्या खेळाडूचा फोटो एखाद्या देशाच्या चलनावर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. मेस्सीने आणि त्याच्या संघाने देशाला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच सन्मान मिळवून दिला आहे. मात्र, नोटांवर एखाद्या खेळाडूचा फोटो लावण्यात येणे, हे पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. अद्याप या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मेस्सीचा फोटो नोटांवर येण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय नसला तरी, तेथील सरकारच्या आर्थिक विभागातील अधिकाऱ्यांची याबाबत हालचाल सुरु असल्याचे समोर आले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रन्सचा ४-२ असा पराभव केला. त्यासोबतच अर्जेंटिनाने या स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. याअगोदर त्यांनी १९७८ आणि १९८६ मध्ये विजेतेपद पटकावले होते.