पुणे – पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती झाली आहे. ते राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) मुंबई येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पुण्यात बदली झाली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने विनयकुमार चौबे यांची नियुक्ती झाली आहे.
चौबे हे राज्याच्या लाचलुचपत विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे. गुप्ता यांनी शहरातील गुंड आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई केली होती. त्यामुळे त्यांचा शहरात दबदबा होता. त्यांनी शंभरहून अधिक मोक्काच्या कारवाया केल्या आहेत.
तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य पोलीस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये या दोन्ही बदल्यांचा समावेश आहे.