नवी दिल्ली – भारतातील नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र असते. मात्र नोटांवर भगवान श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांचेही छायाचित्र असावे अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी केली होती.
त्यामुळे सरकार खरेच गांधीजींचे छायाचित्र हटवण्याबाबत विचार करत आहे का, असा थेट सवाल सरकारला आज विचारण्यात आला होता व त्याला सरकारकडून स्पष्ट शब्दांत नकार देण्यात आला आहे. गांधीजींची प्रतिमा हटवण्याचा प्रश्नच येत नाही असे सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे.
याबाबत बोलताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, गणेशाची आणि माता लक्ष्मीची प्रतिमा नोटेवर असावी अशी मागणी आहे. त्याचसोबत थोर स्वातंत्र्य सैनिक, प्रख्यात व्यक्ती, देवी-देवता आणि काही प्राण्यांची छायाचित्रे असावीत अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र आरबीआय ऍक्टनुसार बॅंकेच्या नोटेचे डिझाइन, फॉर्म आणि मटेरियलबाबत आरबीआयच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या शिफारसीनंतर सरकारची परवानगी घ्यावी लागते त्यानंतरच नोटेत बदल करता येतो.
दरम्यान, मध्यंतरी अशाही बातम्या आल्या होत्या की गुरूदेव रविंद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची छायाचित्रे असणाऱ्या नोटा बाजारात आणण्याचा विचार केला जातो आहे. मात्र त्याचा रिझर्व बॅंकेकडून इन्कार करण्यात आला होता.