पुणे – कॅबचे पेमेंट करताना चुकून डेबिट कार्ड पेमेंटचे बटण दाबले गेले. ही चूक एका बीएसएनएलच्या अधिकाऱ्याला महागात पडली. त्याच्या बॅंक खात्यावर सायबर चोरट्याने 14 लाख 79 हजारांचे कर्ज काढून 3 लाख 94 हजार परस्पर काढून घेतले. याप्रकरणी भामट्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत राऊत (54, रा. हडपसर)यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी पुणे स्टेशनवरुन कॅब बुक केली होती. त्याचे पेमेंट करताना चुकून त्यांच्याकडून डेबिट कार्ड पेमेंटचे बटण दाबले गेले. त्यांनी ते रद्द करुन कॅब चालकाला रोकड दिली. यानंतर त्यांना पैसे रिफंड करण्याचे सांगण्यात आले. त्यांनी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने त्यांना एनी डेक्स ऍप डाऊन डाउनलोड करण्यास सांगून ओटीपी कोणालाही न सांगण्याचे सूचवले. यानंतर त्यांच्या खात्यात 299 रुपये जमा झाले.
यानंतर मात्र, राऊत यांचे डेबिट कार्ड ब्लॉक होऊन सायबर चोरट्याने त्यांच्या बॅंकेची सर्व माहिती काढून घेतली. त्याने स्वत:चा मोबाइल नंबर त्यांच्या बॅंक खात्यास जोडला. यानंतर परस्पर 14 लाख 79 हजार रुपयांचे डिजिटल लोन त्यांच्या बॅंकेतून मंजूर करुन घेतले. यातील 3 लाख 94 हजार रुपयांची रक्कम त्याने तातडीने स्वत:च्या खात्यात वर्ग करुन घेतली.
दरम्यान, दोन दिवसांनी फिर्यादी बॅंकेत गेले असता, त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बॅंक व्यवस्थापकाशी संपर्क साधून उर्वरित रक्कम सायबर भामट्याया खात्यात वर्ग होण्यापासून थांबवली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.