वॉशिंग्टन – युक्रेनविरोधातल्या युद्धात रशिया आता इराणकडून आणखीन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. ड्रोन व्यतिरिक्त जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचीही मागणी रशिया इराणकडे करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या व्यवहाराशी संबंधित असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
रशिया इराणकडून अत्याधुनिक शस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने 2015 मध्ये केलेल्या करारावर इराणने स्वाक्षरी केली आहे. या कराराचा भंग करून इराण रशियाला क्षेपणास्त्रे आणि ड्रोन विकण्याची तयारी करत आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनीही म्हटले आहे. या व्यवहारामुळे इराण आणि रशियादरम्यानचे संरक्षण सहकार्य लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे. याचा परिणाम प्रादेशिक सुरक्षेवरही होणार आहे, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
Maharashtra : हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात होणार मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री शिंदे
काही महिन्यांपूर्वी इराणने रशियाला मोठ्या प्रमाणावर ड्रोनची विक्री केली आहे. रशियाने शस्त्रांसाठी उत्तर कोरियाकडेही मदत मागितली आहे, असे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. इराणकडून अद्याप रशियाला क्षेपणास्त्रे दिली गेल्याचे दिसलेले नाही. मात्र यापूर्वी दिलेल्या शस्त्रांचा युद्धामध्ये परिणामकारक वापर झाल्याचे दिसले आहे, असे व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.