मुंबई – नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. यावेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना, खेळातील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजनही करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी देखील खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. अभिनेत्री सायली संजीवनेही उपस्थित महिलांसोबत धमाल केली. चित्रपटातील इंद्रायणी ही त्यांना आपल्यातीलच एक गृहिणी वाटली. या वेळी अनेकींनी चित्रपट पाहाणार असल्याची इच्छाही व्यक्त केली.
गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात सर्वसामान्य गृहिणी आणि तिला हवी असलेल्या पैठणीच्या प्रवासाची गोष्ट सांगण्यात आली आहे. कष्ट,काम आणि रोजचा संसार यासह स्वप्नांचा प्रवास करणाऱ्या या गृहिणीची गोष्ट प्रत्येक महिलेला आपल्याच संसारातील एक कथा असल्यासारखीच आहे.