मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर सर्वजण ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत होते. खरं तर पैठणी हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच पैठणीच्या या गोष्टीची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे.
सर्वसामान्यांना साधी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी मेहनत या चित्रपटातून सर्वांसमोर येणार असल्याचे दिसते. त्यातच हा प्रवास एका स्त्रीचा तिची पहिली पैठणी घेण्याचा असल्यामुळे ट्रेलर खूपच रंजक वाटत आहे. या वर्षा अखेरीस म्हणजेच २ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.६८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता.
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे.