मुंबई – ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे करण्यात आली. या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांसह,मराठी कथा आणि मराठी अभिनेत्यांनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ हे नाव जरी साधं असलं तरी अनेकांना या नावाने भुरळ घातली आहे. कारण यामध्ये असलेला ‘पैठणी’ हा शब्द खूप काही सांगून जातो. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथालेखन शंतनू रोडे यांनी केले आहे. सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या अगदी साध्य साध्या गोष्टी चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
काय आहे नेमकी पैठणीची गोष्ट
पैठणी हा प्रत्येक स्त्रीसाठी आवडीचा विषय आहे.एका तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. असंच एक स्वप्न, अशीच एक इच्छा या चित्रपटातील नायिकेची असल्याचे समजते. मध्यमवर्गातील स्त्रीच्या इच्छा हौस यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचा टिझर २ वर्षांपूर्वीच रिलीज झाला आहे.
एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना दिग्दर्शक शंतनू यांनी सांगितले की, या सिनेमाची प्रोसेस फार अवघड होती, “लॉकडाऊनच्या आधी शूटिंग आणि नंतर त्याचं पोस्ट प्रोडक्शन झालंय. त्यामुळे त्यात बराच काळ गेलाय. नंतर हा सिनेमा आला. आणि आता अनपेक्षितपणे हा पुरस्कार जाहीर झालाय. मला अजून डायजेस्ट नाही झालंय,” असं त्यांनी सांगितलं.
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाचा टीझर २०२० साली प्रदर्शित झाला आहे.