मुंबई – सरळ, साध्या गृहिणीच्या स्वप्नाचा रंजक प्रवास दाखवणारी ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विशेषतः महिला प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या जवळचा वाटत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अनेक ठिकाणी खास शोजचे आयोजनही करण्यात आले. नुकताच ‘गोष्ट एका पैठणीची’चा खास शो नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता. राजभवनातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजिलेल्या या शोला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले होते आणि विजेत्यांना राज्यपालांच्या हस्ते पैठणी प्रदान करण्यात आली. राज्यपालांकडून या चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया येणे, चित्रपटाच्या टीमचे कौतुक करणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे अशा भावना प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. सर्वसामान्य गृहिणीचा पैठणी साडीबाबतचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
सर्वसामान्य घरातील गृहिणी आणि तिची स्वप्ने यावर या चित्रपटातून अगदी साध्य पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. प्रत्येक स्त्रीला हवी असणारी पैठणी साडी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याने त्याबाबतचा प्रवास खूपच रंजक वाटत आहे. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.