हॉटस्पॉट ठरलेल्या भोर फाट्यावरील उड्डाण पुलाची दुरुस्ती
दर्जेदार कामाअभावी पूल धोकादायक
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता. भोर) येथील उड्डाणपुलावरील धोकादायक खड्डे चुकविताना 27 ऑक्टोबरला कारचा अपघात झाला. यात कार उलटली आणि चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेची त्वरीत दखल घेत महामार्ग प्रशासनाने पुलावरील रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. चालकाच्या मृत्यूनंतर रस्ता दुरुस्तीऐवजी आधीच महामार्ग प्रशासनाला उपरती झाली असती तर एक जीव वाचला असता.
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ उड्डाणपुलावर अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचा अपघात होत असल्याने भोर फाट्यावरील उड्डाणपूल अपघाताचा हॉटस्पॉट ठरला होता. या पुलाच्या निकृष्ट कामावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते, तर भाजपने स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी मागणीही केली होती, तरी प्रशासनाने याची दखल घेतली नव्हती. पुणे-सातारा महामार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी दर्जेदार कामाअभावी रस्त्यावर खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी डांबर टाकून रस्त्यांवर ठिगळे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
या ठिगळांमुळे अनेकवेळा मोठे अपघात होत आहेत. त्यावर महामार्ग दुरुस्ती दाखवत प्रशासनाकडून पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या करातून वसूल केलेल्या निधीचा अपव्यय होत असल्याचे नागरिक बोलत आहेत.
वाहन चालकाविरुद्ध वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वाहन चालवल्याप्रकरणी व अपघातास कारणीभूत झाल्याचे गुन्हे दाखल होत आहेत आणि महामार्ग प्रशासनाला क्लिन चिट दिली जात आहे. मात्र महामार्गावर वारंवार अपघात का होत आहेत, याचे परीक्षण महामार्ग प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे.
– महेश पानसरे, संघटक सदस्य, पुणे जिल्हा, मावळा जवान संघटना