पुणे, दि. 9 -रेल्वेला विविध प्रकारच्या पार्सलमधून महिन्याला लाखो रुपये उत्पन्न मिळते. गेल्या काही महिन्यांत रेल्वेमधून दुचाकी पार्सलच्या प्रमाणात वाढ झाली असून, दिवसाला 50 पेक्षा जास्त दुचाकी रेल्वेने पार्सल केल्या जात आहेत.
पुणे शहरात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने इतर शहराबरोबरच इतर राज्यांतील नागरिक राहतात. त्यासाठी अनेक जण दुचाकी आणतात अथवा विकत घेतात. तर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा दुसऱ्या शहरात नोकरीमध्ये बदली झाल्यानंतर काही जण दुचाकीची येथेच विक्री करतात. तर काही जण दुचाकी घेऊन जातात; पण दुचाकी न्यायची कशी, असा प्रश्न नागरिकांसमोर असतो. मात्र रेल्वेतून दुचाकी वेळेत पार्सल केली जात असल्याने रेल्वेतून दुचाकी पार्सल करण्याचे प्रमाण मागील काही महिन्यांमध्ये वाढले आहे.
पुणे रेल्वे विभागाकडे दिवसाला साधारणतः 70 दुचाकी पार्सलसाठी बुकिंग केले जाते. तर, साधारण 54 दुचाकी पार्सल केल्या जात आहेत. यामध्ये बहुतांश जुन्याच दुचाकींचा समावेश आहे. दुचाकी वेळेत पार्सल होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामधून नागरिकांची सोय होत असून, रेल्वेला महसूल देखील मिळात आहे. दुचाकीबरोबरच रेल्वेतून फळे, पालेभाज्या अशा स्वरुपाचे पार्सल पाठविले जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सात महिन्यांत दीडशे कोटी
गेल्या सात महिन्यांत मध्य रेल्वेकडून तीन लाख टन पार्सल वाहतूक करण्यात आली. त्या माध्यमातून रेल्वेला 150 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यापैकी ऑक्टोबर महिन्यात 21.72 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पार्सलमधून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
नागरिकांनी रेल्वेतून पाठविलेल्या पार्सलची माहिती त्यांना मिळावी, यासाठी रेल्वेने 9699746080 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. या क्रमांकावर फोन केल्यास नागरिकांना त्यांच्या पार्सलची स्थिती, नवीन पार्सल कसे पाठवायचे, अशा गोष्टींची माहिती दिली जात आहे. या क्रमांकावर दररोज नागरिक फोन करून चौकशी करत आहेत.
-डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, पुणे रेल्वे विभाग