नागपूर – दुर्गम गडचिरोली जिल्ह्याचा विकास हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे. त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आज भामरागड येथे जात असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
नक्षलवादासोबत सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड परिसरातील धोडराज पोलीस चेक पोस्ट येथे पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते आज येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी विमानतळावर ते बोलत होते.
दिवाळीसारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या, आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणे समाधानाची बाब आहे. पालकमंत्री असताना दिवाळी पोलिसांसोबत साजरी करीत होतो. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
येथील जवान अतिशय चोखपणे आपले कर्तव्य बजावत असून नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांच्या सोबत #दिवाळी साजरी केली. pic.twitter.com/msH8EoIVSG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2022
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. यापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता. तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी घेतली होती. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदेंनी पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. यावरून सीएमचा पीएम पॅटर्न असल्याची चर्चा सुरु आहे.