‘प्रभात दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे –“प्रभात दीपोत्सवा’तील सर्वच वाचनीय घटक आणि खुमासदार लेखनशैली यांचा दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळा ठसा कायम आहे. याचबरोबर “प्रभात’ परिवाराशी पूर्वीपासूनच ऋणानुबंध आहे, असे सांगून “प्रभात’च्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी “अर्हम फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांनी शुभेच्छा दिल्या.
“प्रभात दीपोत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. यावेळी अर्हम फाउंडेशनचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख स्वराज पगारिया, “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी आणि “प्रभात’ परिवारातील सदस्य उपस्थित होते. डॉ. पगारिया हे विविध समाजोपयोगी क्षेत्रात कार्यरत असून, काश्मीरमधील सोपोर परिसरात त्यांनी शाळा सुरू केली आहे. पुण्यातील काही संस्था, काही सहकारी आणि अनाथ मुलांच्या माध्यमांतून या शाळेचे कार्य सुरू आहे.
बी. एल. स्वामी यांनी दिवाळी अंकाबाबत माहिती देताना सांगितले की, सर्वसमावेशक आणि दिवाळीतील सर्व घटकांना अनुसरूनच लेखांची रचना केली असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या जीवनानुभवावरील लेख या अंकाचे विशेष आहे. ‘गृहिणी ते अर्थमंत्री’ या त्यांच्या प्रवासाबाबत माहिती असलेले लेख अंकाचे वेगळेपण स्पष्ट करतो. एका परदेशी मुलीचा भारतातील वास्तव्याचा अनुभव “आमची जर्मन लेक’ या लेखाची पार्श्वभूमीही त्यांनी स्पष्ट केली.
“प्रभात’च्या दिवाळी अंकाची परंपरा आणि त्यातील लेखांबाबतची वैशिष्ट्ये बी. एल. स्वामी यांनी विशद केली. अंकातील लेखांबाबत सहायक संपादक सत्यवान सुरळकर यांनी माहिती दिली. कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी प्रास्ताविक केले. सहायक सरव्यवस्थापक रवी इंडी यांनी आभार मानले.