मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. उद्धव ठाकरे आपला राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी न्यायालयासह निवडणूक आयोगासमोर लढाई लढवत आहेत. आता अंधेरीतील पोट निवडणुकीवरून सत्ताधारी आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा वाद सुरु झाला आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. अशात शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली आहे.
लटके या महानगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्यामुळे ते राजीनामा मंजूर करत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. याच आरोपाला उत्तर देताना पावसकर म्हणाले,दबाव आणण्यासाठी हे काय कोविडमधील टेंडर आहे का ? सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना पावसकर यांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला.
एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात, अशी टीकाही पावसकर यांनी यावेळी केली.