कीव्ह : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण क्रीमियामध्ये झालेल्या स्फोटानंतर रशियाने अधिक आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रीमियामधील एका पुलावर स्फोट झाला. रशियाने या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार ठरवत त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
रशियाने आता युक्रेनवर 75 क्षेपणास्त्रं डागत हल्ला केला आहे. यामध्ये सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 लोक जखमी झाले आहेत. युद्ध सुरु झाल्यापासूनचा युक्रेनवर रशियाने केलेला आतापर्यंतला हा मोठा हल्ला असल्याचे म्हटले जाते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी 10 ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनवर हा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
क्रीमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे रशिया अधिक खवळला आहे. मात्र युक्रेनने क्रीमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित रशियाने केलेले आरोप फेटाळले आहेत. यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या क्षेपणास्त्रं हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठे नुकसान झाले आहे.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्रं हल्ल्याचे मुख्य उद्दीष्ट युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा सुविधांचे नुकसान करणे आहे. यामुळे युक्रेनची राजधानी कीव्हसह ऊर्जा स्त्रोत असणाऱ्या दक्षिणेकडील अनेक शहरांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, देशभरात रशियाकडून अनेक हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले गेले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. रशियाने हल्ले करत युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शहरातील अनेक भागात धुराचे लोट उठताना दिसत आहे. क्रीमियातील ब्रिज स्फोटानंतर आक्रमक झालेल्या पुतिन यांनी सोमवारी क्रीमियामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठकही बोलावली होती. त्यानंतर युक्रेववर 75 क्षेपणास्त्रं डागण्यात आली.