पुणे, दि. 29 -बालकाचा जन्म झाल्या दिवसापासून वयाच्या 16 व्या वर्षांपर्यंत महापालिका आरोग्य केंद्रात विविध लशी मोफत मिळतात. आता गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने यामध्ये “पीसीव्ही’ या न्यूमोनिया लशीचा समावेश केला आहे. बालकांचा जन्म झाल्या दिवसापासून 24 तासांच्या आत “बीसीजी’ची लस दिली जाते. याशिवाय ओरल, पोलिओ हिपेटायटीस बी या लशी सुरुवातीच्या काही तासांत दिल्या जातात. त्यानंतर दीड महिने वयापासूनच्या पीसीव्ही, पेन्टा, ओरल पोलिओ, रोटा, आयपीव्ही या लशी दिल्या जातात.
दीड महिने ते नऊ महिन्यांपर्यंतच्या लसीकरण वेळापत्रकात “पीसीव्ही’ ही लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. या लशीचे बाजारमूल्य काही हजारांमध्ये आहे. त्यामुळे ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळेच न्यूमोनिया होऊन मूल दगावण्याचे किंवा फुफ्फुसांवर परिणाम होण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र आता ही लस महापालिका आरोग्य केंद्रात मोफत मिळत आहे.
याशिवाय अडीच महिने, साडेतीन महिने वय असलेल्या बालकांनाही त्या त्या वयाप्रमाणे महत्त्वाच्या असलेल्या लशी दिल्या जातात. नऊ महिने वयात एमआर 1, व्हिटॅमिन ए चा पहिला डोसही दिला जातो. त्यानंतर 16 महिने ते 24 महिन्यांत याच लशींचे दुसरे डोस मुलांना दिले जातात. डीपीटीचा दुसरा डोस पाच वर्षे वयापासून ते सात वर्षांपर्यंत कधीही देता येतो. तोही या केंद्रामध्ये मिळतो. याशिवाय 10 आणि 16 वर्षे वयाच्या मुलांना टीडीचा डोस दिला जातो.