सातारा – बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद, शेतकरी आणि कामगार आपल्या कारखान्याचा कणा आहेत, गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 141 रुपये तिसरा हप्ता आणि कामगारांना 18 टक्के बोनस देणार असल्याचे असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दसऱ्यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे सभासद, शेतकरी आणि कामगारांचा दसरा- दिवाळी गोड झाली आहे.
शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉलमध्ये अजिंक्यतारा कारखान्याची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, प्रतीक कदम, माजी पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, मिलिंद कदम, धर्मराज घोरपडे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उच्चांकी गाळप करणाऱ्या 19 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील 18 विषयांचे वाचन केले.
सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सभासदांनी केलेल्या सूचना आणि प्रश्नांना उत्तरे दिली. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली असून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यासाठी उपपदार्थांचे उत्पादन वाढवणे तसेच मागच्या हंगामासारखे साखरेची निर्यात करणे हे धोरण आगामी हंगामातही अवलंबण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 141 रुपये याप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाचे 12 कोटी 27 लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खाती लवकरच जमा केले जाणार आहेत. कामगार- कर्मचाऱ्यांना 18 टक्केप्रमाणे 3 कोटी 26 लाख रुपये बोनस म्हणून दिले जाणार आहेत. दसऱ्यापूर्वीच उसाचा तिसरा हप्ता आणि बोनस जाहीर करणारा अजिंक्यतारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना आहे. संचालक नामदेव सावंत यांनी स्वागत केले.
सभेला ज्येष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद चव्हाण, माजी सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, सूतगिरणीचे अध्यक्ष उत्तमराव नावडकर, जालिंदर महाडिक, पंडितराव सावंत, अजित साळुंखे, जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम, गणपतराव शिंदे, विक्रम पवार, नितीन पाटील, युनियन अध्यक्ष कृष्णत धनवे, सयाजी कदम यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.