दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभेत संचालक मंडळाचे वाभाडे
माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमोर आरोप-प्रत्यारोप
वरवंड – दौंड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यात आले. अहवालात इमारत खर्चापोटी 36 लाख रुपये दाखविण्यात आले. “इमारत दाखवा, अन्यथा चूक कबूल करा’, असा पवित्रा यावेळी सभासदांनी घेतला. यावेळी 2021-22 ताळेबंद अंशतः नामंजूर करण्यात आला. माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत आरोप-प्रत्यारोप झाल्याने दौंड राष्ट्रवादीमधील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे.
संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा बॅंकेचे संचालक आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 29) केडगाव (ता. दौंड) येथे पार पडली. यावेळी सयाजी ताकवणे, रामभाऊ टुले, नितीन दोरगे, भिवाजी गरदडे, रामभाऊ रूपनवर, झुंबर गायकवाड, धोंडिबा शेळके, अनामिका भापकर, निर्मला नागवडे, रामचंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी संघाचे व्यवस्थापक सुहास रूपनवर यांनी अहवाल वाचन केले.
तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीचा खर्च चालू ताळेबंदात दाखविण्यात आला आहे. हा खर्च बोगस असल्याचा मुद्दा नानासाहेब जेधे आणि संघाचे माजी अध्यक्ष पाराजी हंडाळ यांनी उपस्थित केला. संचालक लक्ष्मण दिवेकर आणि उद्धव फुले यांनी या मुद्द्याला विरोध केला. संघाला सहा लाख रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले आहे. हा नफा ओढूनताणून दाखवला असल्याचे जेधे यांनी नमूद केले. संघाने पुणे जिल्हा बॅंकेकडून अडीच कोटी रुपयांची सीसी घेतली आहे.
आज संघात खताचे एकही पोते शिल्लक नाही. संघाने अडीच कोटी रुपये सीसीचे काय केले ते सभासदांना समजले पाहिजे, अशी मागणी हंडाळ यांनी केली. यावेळी विद्यमान संचालक राजेंद्र बुऱ्हाडे म्हणाले, गेले आठ महिने संघाचे 15 पैकी 9 खत डेपो बंद आहेत. शेतकऱ्यांची खतांमुळे अडचण होत आहे. संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बोत्रे म्हणाले, ताळेबंदात 4 लाख 92 हजार रुपयांचे मोटार भाडे दाखविण्यात आले आहे, ही गंभीर बाब आहे.
भिवाजी गरदडे म्हणाले, ताळेबंदात फ्रॉड नाही. बेरजा चुकत आहे. त्यावर पाराजी हंडाळ यांनी जोरदार आक्षेप घेत फ्रॉड असल्याचे नमूद केले. हंडाळ म्हणाले, संघाला 91 लाख रुपयांचा तोटा आहे. संघाचे विद्यमान अध्यक्ष अशोक नरूटे यांनी संघाला सहा लाख रुपयांचा नफा झाला असून खते व औषधे एमआरपीप्रमाणे विकण्यात आल्याचे सांगितले. यावेळी व्यवस्थापक सुहास रूपनवर यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने सभासदांचे समाधान झाले नाही.
माझ्या नेतृत्वाखाली सर्व संस्था उत्तमरीतीने चालू आहेत. मात्र संघाबद्दल फार तक्रारी आहेत. आगामी काळात यात सुधारणा करणे गरजेचे आहे. जो दोषी आहे त्याला मी पाठीशी घालणार नाही. माझ्याकडे पाहून गप्प बसू नका. जे आहे ते उघडपणे मांडा. पुणे जिल्हा बॅंकेत ईडीवाले, सीबीआय’लाही काही सापडले नाही, इतका पारदर्शी कारभार आहे.
-रमेश थोरात, जिल्हा बॅंकेचे संचालक आणि माजी आमदार
खत पिशवीमागे 100 रुपयांचा नफा
संघाने अहवाल काळात खत विक्री केली त्यात प्रत्येक खत पिशवीमागे संघाने 100 रुपये नफा काढला असल्याचे यावेळी प्रोत्तरात उघडकीस आले आहे.