न्यूयॉर्क – जागतिक मंदीची शक्यता, रशियाच्या तेलदरावर निर्बंध घालण्याची अमेरिकेची धमकी, वधारत असलेला डॉलर या कारणामुळे गेल्या 15 दिवसापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असून आता कच्च्या तेलाचे दर नऊ महिन्याच्या निचांकावर आले असल्याचे दिसून येते.
अमेरिकेतील ब्रेंट क्रूडचे दर सध्या 84 डॉलरवर असून इतर बाजारातील दरही कमी अधिक प्रमाणात याच पातळीवर आहेत. अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे अमेरिकेचा डॉलर बळकट होत आहे. त्यामुळे डॉलरच्या माध्यमातून कच्च्या तेलाचे दर कमी झाले असल्याचे दिसून येते असे विश्लेषकांनी सांगितले.
युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये औद्योगिक उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात या मोठ्या देशाकडून कच्च्या तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत. गेल्या महिन्यात तेल उत्पादक देशांनी तेलाचे दर कमी होऊ नये त्यासाठी उत्पादन 10 टक्क्यांनी कमी केले आहेत.
मात्र तरीही तेलाचे दर घसरत आहेत. तेल वापरणाऱ्या देशांत व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भांडवलाचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे मंदी निर्माण झाली तरीही व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी घेतला आहे. त्यामुळे या घडामोडीचा कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
भारताला फायदा होणार –
विविध घडामोडीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी त्याचा अप्रत्यक्षरीत्या भारताला फायदा होणार आहे. भारतामधील औद्योगिक उत्पादन उच्च पातळीवर आहे. त्याचबरोबर भारताची तेलाचा वापर करण्याची क्षमता अबाधित आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला स्वस्त कच्चे तेल मिळाल्यास इंधनाचा खर्च कमी होऊन औद्योगिक उत्पादन वाढण्यास मदत होईल असे काही विश्लेषकांनी सांगितले.