नवी दिल्ली : देशात आता करोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 44 हजार 436 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकंच नाही तर देशातील नवीन करोना रुग्णांचा आलेखही घसरला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी ही संख्या पाच हजारांच्या पुढे होती. आदल्या दिवशी देशात 5 हजार 383 करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आज तुलनेने 441 रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसत आहेत. देशातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
करोना संसर्गाचा आलेख जरी घसरताना दिसत असला तरी करोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल हा आकडा 20 वर होता. तर देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 487 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात शुक्रवारी 611 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, तर दोन बाधितांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. शुक्रवारी राज्यात 687 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.