मुंबई – उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. गेल्या काही आठवड्यापासून सुरु असलेला दसरा मेळाव्याचा संघर्ष ठाकरेंनी जिंकला आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगत दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच घेणार असे प्रयत्न सुरु केले. पण, उद्धव ठाकरे यांनी आज मैदान जिंकले आहे. न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
शिवसेना युक्तिवाद काय
2016च्या अध्यादेशानुसार दसरा मेळाव्याची परवानगी आम्हाला आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणे हे शिवसेनेची परंपरा आहे. गेली अनेक वर्षे मेळावा होतो. त्यामुळे तो शिवसेनेचा अधिकारच आहे. शिवसेना कुणाची हा वेगळा मुद्दा, त्याचा मेळाव्याशी संबंध नाही. दसरा मेळाव्याचा अर्ज अगोदर कुणी केला आणि नंतर कुणी केला याचा प्रश्नच येत नाही. येथे प्राधान्यक्रमाचा नियम लागू होत नाही.
महापालिकेचा युक्तिवाद काय
दसरा मेळावा झाला, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखाद्या सार्वजनिक जागेवर कुणीही कायमचा हक्क सांगू शकत नाही. आम्ही कुणाचीही बाजू न घेता तूर्तास कुणालाच परवानगी दिलेली नाही.
शिंदे गटाकडून युक्तिवाद
आम्ही अन्य कुठेही मैदानासाठी परवानगी मागितलेली नाही. खरी शिवसेना कोणती आहे, हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. खरी शिवसेना ही शिंदेंचीच, त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कसाठी सर्वात आधी, आम्ही अर्ज केलेला आहे.
उच्च न्यायालय काय म्हणाले?
खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो विषय सर्वोच्च न्यायालय आणि आयोगाकडे प्रलंबित आहे. या निकालाचा त्यांच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण शिवसेनेचा अर्ज फेटाळून पालिकेने अधिकारांचा दुरूपयोग केला आहे. इतकी वर्षे आयोजन होते, कधीच गालबोट लागलेले नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेतली जाईल. सरवणकरांची हस्तक्षेप याचिका आम्ही फेटाळत आहोत. शिवसेनेने परवानगीसाठी केलेली याचिका मंजूर करत आहोत.