वाघोली – लोणीकंद पोलीस ठाणे अंतर्गत वाघोली पोलीस चौकीतील प्रभारी अधिकारी बदलण्याची मागणी भाजप नेते संदीप सातव यांनी केली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक प्रभातने बुधवारी (दि. १५) प्रसिद्ध केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने वाघोली पोलीस चौकीच्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून वाघोली पोलीस चौकीचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्या जागी आता नवीन प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक होणार असून याची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.
भाजप नेते संदीप सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे त्या अधिकाऱ्याने सातव यांना वाघोलीतील एका सोसायटीच्या सांडपाणी प्रश्नाबाबत पोलीस यंत्रणेला अधिकार नसताना देखील गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवत त्या अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून पैशांची मागणी केली असल्याचा आरोप सातव यांनी केला होता.
तसेच सातव यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत तातडीने त्या प्रभारी अधिकाऱ्याचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यामुळे संदीप सातव यांसह ग्रामस्थांनी दैनिक प्रभातचे आभार मानले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनानुसार या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला होता. त्यानुसार वाघोली पोलीस चौकीच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
– संदीप सातव, संघटन सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा