हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – पावसाळ्याचे दिवस हे सुगरण पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. धरतीने हिरवा शालू परिधान करताच या पक्ष्याला विनीच्या हंगामाचे वेध लागतात. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या विहिरीच्या काठावर असलेल्या झाडा झुडपावर सुगरण पक्ष्यांमध्ये घरटे बांधायची लगबग सुरू झाली आहे. सुगरण पक्ष्यांचा विनीचा हंगाम सुरू झाल्याने विहारी काठीच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे.
चिमणीचे घरटे आतून अतिशय उबदार असते. छान मऊ कापूस, तलम धागे आणि गवत यांचा बिछाना आत असतो. या घरटय़ात पिले अगदी सुखात वाढतात. मात्र.. या मऊमुलायम बिछान्याखाली काही काटेही असतात. पिलांचे वजन जसजसे वाढते तसतसे त्यांना खालचे काटे टोचू लागतात. अखेरीस टोचणे सहन न होऊन ही पिले धडपडत घरटय़ाच्या बाहेर येतात आणि लवकरच गगनभरारी घेतात. पिलांना स्वावलंबी बनविण्याचा हा अनोखा मार्ग माणसाने पक्ष्यांकडून शिकण्यासारखा आहे.
या विनीच्या हंगामात नराचे डोके पिवळे असते व पाठीवर तपकिरी रेषा व छातीचा भाग पिवळा व उर्वरित भाग फिकट पांढरा पाहावयास मिळतो. एका वेळी ते दहा ते पंधरा अर्धवट घरटी झाल्यानंतर नर सुगरण घरट्यातजवळ बसून छान गाणी गुणगुणत असतो. प्रत्येक घरटी तपासून पहिल्यावरच मादीला घरटे पसंत पडते. नंतर मादी उर्वरित घरटे पूर्ण करते. परंतु एकहि घरटे जर मादीला पसंत पडले नाही तर नर तो परिसर सोडून दुसरे ठिकाण शोधतो. असे जुने ग्रामस्थ सांगतात.
मे महीन्यापासून सप्टेंबर महीन्याच्या कालावधीत या पक्ष्यांच्या घरटे विनीचा हंगाम असतो. सुगरण पक्षांमध्ये नर हा मुख्य घरट्याचे विनकाम करतो. हे घरटे गवताच्या काड्या, गवत पाने, कापूस व इतर वनस्पतीच्या काड्यापासून तयार करतात. जास्त तर घरटे विहीरीच्या बाजूच्या झाडामध्ये येतात.
घरट्याचे स्वरूप व पक्ष्यांची दिनचर्या
एकावेळी मादी ३ ते ४ पांढऱ्या शुभ्र रंगाची अंडी घालत असतात. अंडींना उब देणे पिल्लांना खाऊ घालणे हे काम मादी करत असते. असे सुंदर खोऱ्याचे सौदर्य सध्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील झाडा झुडपावर तसेच विहिरीच्या काठावर पाहायला मिळत आहे.
घरट्याच्या खालच्या बाजूने आतमध्ये जाण्यासाठी मार्ग असून खालून निमुळता आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलकार असते. साधारणपणे घरट्यात दोन किंवा जास्त कप्पे तयार केलेले असतात घरट्याच्या गोलकार भागात थोड्या प्रमाणात ओल्या मातीचा गीलावा असतो.