औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत व प्रत्येक व्यक्तीला 250 ते 300 रूपये वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे.
अंगणवाडी सेविकांना तर अधिकाऱ्यांनीच आदेश दिल्याची चर्चा आहे. तसेच पैसे वाटपाबाबतची क्लिपही व्हायरल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातून मंत्रिपदी वर्णी लागलेल्या संदीपान भूमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मिळालेल्या 50 खोक्यातून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
खैरे म्हणाले की मागच्या वेळी एकनाथ शिंदे जेव्हा पैठणला आले होते, तेव्हा 25 खुर्च्या होत्या. त्यामुळे आता त्यांना खुश करण्यासाठी पैसे वाटून गर्दी जमवली जाते आहे. मराठवाड्याच्या विविध भागांतून फोन आले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अगंणवाडीच्या महिला आणि इतरही महिलांना प्रत्येकी 250-300 रूपये देऊन गाडीत बसवण्यात आले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भूमरे यांच्या सभेची आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सभेची तुलनाच करू शकत नाही असे सांगताना त्यांनी भूमरे यांच्यावर व्यक्तीगत टीकाही केली.
अजित पवार म्हणतात, अशी वेळ येणे दुर्दैव
मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, 42 गावांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनीच हे आदेश दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी जर अशी वेळ आली असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्यात हा प्रकार पहिल्यांदाच घडतो आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सभेला गेले तर तेथील मुलांनी काय करायचे असा सवाल उपस्थित करून त्यांनी या सगळ्याच प्रकारावर आक्षेप घेतला आहे.