मुंबई – शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाही. मग “फोडा-झोडा-मजा पहा’ ही ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपावर टीका करण्यात आली. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार?, असा टोलाही लगावण्यात आला आहे.
ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे गट व शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर चाल करून गेले. आपापसात डोकी फुटली. एकमेकांचे कपडे फाटले. यात भाजपचे काय गेले? गमावले ते कष्टकरी मराठी माणसाने.
आता काय तर म्हणे त्यांचे “मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे “कमिशन मुंबई’ आहे. मुंबईतील मराठी माणसांत फूट पाडायची. त्यासाठी सत्ता आणि पैशांचा वारेमाप उपयोग करायचा. हा त्यांचा कावा. आमचे शिवतीर्थ व त्यांचे शिवतीर्थ वेगळे आहे.
आम्ही शिवतीर्थी दसरा मेळावा घेऊन विचारांचे सोने लुटू नये, 56 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची महान परंपरा खंडित व्हावी यासाठी त्यांचे “मिशन’ सुरू आहे. अरे सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे.