नवी दिल्ली – मला दिल्लीच्या उत्पादनशुल्क धोरणाच्या संबंधात खोटेपणाने फसवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने ज्या सीबीआय अधिकाऱ्यावर दबाव आणला जात होता, त्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, जितेंद्रकुमार नावाच्या सीबीआय अधिकाऱ्याने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली आहे. ते सीबीआय मध्ये, लाचलुचपत विरोधी विभागात उप कायदे सल्लागार म्हणून काम करीत होते. माझ्या विरोधात जो बोगस गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या कायदेशीर बाबी तेच तपासत होते. मला अटक करण्यासाठी माझ्या विरोधात खोट्या केसेस तयार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता असा आरोपही त्यांनी केला आहे.
या अनुषंगाने पंतप्रधानांना उद्देशून सिसोदिया यांनी म्हटले आहे की, तुम्हाला मला खोट्या केस मध्ये अडकवायचे आहे, मला अटक करायची आहे तर तुम्ही जरूर ते करा पण त्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर करू नका. त्यांचे घर पोरके होते त्यांच्या घरावर ही आपत्ती आणू नका असेही त्यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने आज आम आदमी पक्षाच्या सरकारच्या विरोधात एक स्टींग ऑपरेशन केल्याचा व्हिडीओ जारी केला. त्याचा समाचार घेताना सिसोदिया यांनी म्हटले आहे की, माझ्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही म्हणून त्यांनी कोणालाही उभे करून एक बनावट स्टींग ऑपरेशन जारी केले आहे. असल्या अनेक व्हिडीओ क्लीपिंग माझ्याकडेही आहेत. उद्यापासून मी त्या बाहेर काढीन असे आव्हानही त्यांनी दिले. लोकांकडून निवडून आलेली सरकारे पाडणे हेच भाजपचे देशातले एकमेव कार्य राहिले आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यासाठी तुम्ही आणखी किती जणांचे बळी घेणार आहात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.