प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महामेट्रोकडून पुणेकरांसाठी आगळी वेगळी भेट देण्यात आली. महामेट्रोकडून गरवारे महाविद्यालय ते डेक्कन आणि फुगेवाडी स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत पहिली “ट्रायल रन’ घेण्यात आली. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे महाविद्यालय स्टेशनपासून सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महामेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गरवारे मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत चाचणी घेण्यात आली. परतीच्या प्रवासाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो त्याच वेळेस धावली.
दोन्ही गाड्यांचा “ट्रायल रन’चा वेग ताशी 15 किमी होता. तो नियोजनाप्रमाणे पूर्ण करण्यात आला. त्यामुळे पुढील काही चाचण्या आणि मार्गाचे सुरक्षा ऑडीट पूर्ण झाल्यानंतर वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानकापर्यंत धावणारी मेट्रो डेक्कनपर्यंत धावणार असून, त्यानंतर लगेच महापालिका स्थानकापर्यंतची चाचणीही केली जाणार आहे.
दैनंदिन प्रवासी
संख्येचा विक्रम…
पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी मागील दिवसांचा विक्रम सोमवारी मोडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनी सुमारे 87 हजार 429 प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. यापूर्वी दैनंदिन प्रवासी रेकॉर्ड प्रति दिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे दिवसभर मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. मेट्रोला या दिवशी सर्वाधिक 8 लाख 16 हजार 560 रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले.