प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 13 -लोहगाव अंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे-अहमदाबाद पहिली थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. ही विमानसेवा 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
भारतातील दोन स्मार्ट शहरे तसेच वाणिज्य आणि शैक्षणिक केंद्रे म्हणून वेगाने विस्तारत असलेल्या पुणे व अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान एअर कनेक्टिव्हिटीची असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी एअर इंडियाने या नव्या मार्गाचा समावेश आपल्या नेटवर्कमध्ये करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाचे विमान एआय 0481 अहमदाबाद विमानतळावरून सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी निघून पुणे विमानतळावर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल, त्याचप्रमाणे विमान एआय 0482 पुणे विमानतळावरून दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी निघून अहमदबाद विमानतळावर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल.
या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासाला लागणारा अंदाजे वेळ 85 ते 90 मिनिटांचा असेल. करोना काळापासून ही सेवा बंद होती.
एअर इंडियाचे एमडी व सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन महत्त्वाची प्रगती केंद्रे असलेल्या पुणे व अहमदाबाद दरम्यान विमानसेवेचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या प्रवाशांना सुविधाजनक प्रवासाचे अजून जास्त पर्याय उपलब्ध करून अधिक सक्षम बनवणारे हे पुढचे पाऊल आम्ही उचलत आहोत.’