मुंढवा, दि. 9 (प्रतिनिधी) -महानगरपालिकेने पुणे शहरात पशुपालन करणाऱ्यांना मुंढवा-केशवनगर येथे गायरान येथील जागेत गोठ्यांसाठी जागा दिल्या आहेत. परंतु, त्याठिकाणी प्रत्यक्षात पशुपालनाऐवजी अनधिकृतपणे बांधकामे करून अन्य व्यवसाय सुरू आहेत. येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संदीप लोणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये गाई, म्हशींसारखी गुरे पाळणाऱ्यांना महापालिकेने केशवनगर येथील महापालिकेच्या जागेमध्ये गोठ्यांसाठी जागा देउन त्यांचे पुनर्वसन केले आहे. याठिकाणी अनेक गोठे मालकांनी जागा घेतली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून याठिकाणचे बहुतांश गोठे बंद झाले असून त्याठिकाणी पक्के बांधकाम करून अन्य व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. यामुळे महापालिकेच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. गोठ्यांच्या नावाखाली काही मंडळींनी दलाली करून महापालिकेची जागा दुसऱ्यांच्या घशात घातल्या आहेत. यासाठी कागदोपत्री अथवा तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्याची गुरे आणून तसेच दूध व्यवसायाचे बनावट पुरावे तयार करून गोठ्यांच्या जागा लाटण्यात आल्या आहेत, असा आरोप लोणकर यांनी आयुक्त, आरोग्य विभाग आणि मालमत्ता विभागाला दिलेल्या निवेदनात केला आहे.
जागा मिळविण्यासाठी कथित गोठे मालकांनी दिलेली कागदपत्रे, त्यांनी दाखविलेले पुरावे, जागा वाटप झालेल्यांच्या नावाची यादी आणि सध्या जागेचा वापर करत असलेल्यांच्या नावाची यादी याची तपासणी करावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. गोठ्यांच्या ठिकाणी अन्य व्यवसायांसाठी करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम काढावे. तसेच, या गैरव्यवहारात त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही लोणकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने शहरातील गोठे धारकांचे पुरावे घेऊनच केशवनगर येथे गोठे धारकांना जागा दिली आहे. दहा गुरांमध्ये अडीच गुंठे जागावाटप करण्यात आली आहे. परंतु, आता त्याठिकाणी पशुपालन व दूध व्यवसायच होतो का, याची तपासणी करण्यात आलेली नाही. लवकरच याठिकाणी सर्वेक्षण करून पुढील कारवाई करण्यात येईल.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका, पुणे
महापालिका प्रशासनाने गोठेधारकांनी सादर केलेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष जागेवर सुरू असलेल्या व्यवसायांची पाहणी करावी तसेच अतिक्रमणे काढून दोषींवर कडक कारवाई करावी. या व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
– संदीप लोणकर, शहर सरचिटणीस, भाजपा