हडपसर, दि. 9 (प्रतिनिधी) -हडपसर परिसरातील नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या स्कूल मिनीबसने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत बसला लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात घबराट उडाली आहे.
हडपसर येथील एंजल मिकी मिनी स्कूलच्या आवारात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मिनीबसला अचानक आग लागली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड, जवान सरोदे, चौधरी, दडस, कोंडगेकर, बिचकुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
मिनी स्कूलबसला आग लागण्यामागचे कारण समजू शकलेले नाही. गेल्या महिन्यांत कात्रज-कोंढवा रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला आग लागली होती. मिनीबसच्या अंतर्गत शॉर्टसर्किंट होऊन आग लागण्याच्या घटना घडत आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.