मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असून, भाजप आमदार आशिष शेलार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. तसेच भाजपमधील मराठा नेते म्हणूनही ते परिचित आहेत. सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मराठा नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद राहावे, अशी भाजपच्या श्रेष्ठींची इच्छा आहे.
त्याच पार्श्वभूमीवर भाजपमधील चंद्रकांत पाटलांनंतर मराठा चेहरा असलेल्या आशिष शेलार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आशिष शेलारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे आणि उत्तम संबंध आहेत. त्यामुळे पक्षाच्या बांधणी आणि वाढीसाठी आशिष शेलारांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. 2014 ला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काही काळ आशिष शेलार यांनी शिक्षणमंत्री पदही भूषवले होते.
मुंबई महापालिकेतही आशिष शेलार यांचा चांगलाच दबदबा आहे. आता येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीतही आशिष शेलारांचा भाजपला फायदा होण्याचा अंदाज आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अधांतरी असतानाच भाजपचे शिंदे गटाचे मराठा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना संधी दिली. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदीही मराठा नेत्याच्या रूपात आशिष शेलारांना स्थान मिळण्याची चर्चा आहे.