येरवडा, दि. 6 (प्रतिनिधी) -लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे कमी करण्यासाठी पॉक्सो कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी पालक, शिक्षक यासंह समाजातील सर्व घटकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे, असे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले.
पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ-4 विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी शालेय विद्यार्थी सुरक्षा आणि पॉक्सो कायदा मार्गदर्शन कार्यशाळा व याविषयावर पोलीस आयुक्तांशी संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुप्ता बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, उपप्रादेशिक अधिकारी संजीव भोर, सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर, पालिका शिक्षण अधिकारी मिनाक्षी राउत तसेच परीमंडळ अंतर्गत येणारे सर्व पोलीस अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
शाळांनी ठोस उपाय योजना कराव्यात, अनुचित प्रकार थांबत नसतील तर पोलिसांची मदत घ्यावी, पोलीसांशी संवाद असणे महत्वाचे असल्याचेही आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक मयुरी पवार यांनी पॉक्सो कायद्याची माहिती व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यसनमुक्तीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाळेत बोलावुन पालकांना याविषयी माहिती दिल्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असे उपायुक्त रोहिदास पवार यांनी प्रास्ताविकेत सांगितले. सुत्रसंचालन विवेक देव यांनी केले.