बगदाद – इराकच्या संसदेमध्ये घुसलेल्या हजारो कट्टरवाद्यांनी आज (रविवारी) ही संसदेत धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे. सुरक्षा रक्षकांनी उभे केलेले सिमेंटचे अडथळे ओलांडून त्यांनी काल संसदेच्या आवारात प्रवेश केला होता. तेंव्हापासून संसदेच्या इमारतीमध्येच या आंदोलकांनी मुक्काम ठोकला आहे.
इराण धार्जिण्या गटांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना उलथवून टाकण्याचा निर्धार शिया धर्मगुरू मौलाना मुकतदा अल सद्र यांचे समर्थक असलेल्या या आंदोलकांनी बोलून दाखवला आहे. इराकमध्ये दोन प्रमुख शिया गटांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्यापासून हे आंदोलन इराकच्या केंद्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
संसदेच्या आवारात धरणे आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांनी रविवारी चक्क आनंदोत्सव साजरा केला. मुकतदा अल सद्र यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि चक्क आनंदाने नाचदेखील केला. सभागृहातील गालिच्यावर त्यांनी मस्तपैकी विश्रांतीदेखील घेतली.
गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा शनिवारी या आंदोलकांनी संसदेच्या आवारात घुसून निदर्शने केली होती. बुधवारीही हे आंदोलक संसदेच्या आवारात घुसले होते. मात्र अल सद्र यांच्या आवाहनानंतर ते संध्याकाळी निघून गेले होते.
शनिवारी संसदेत घुसल्यानंतर अजून त्यांनी तेथून मुक्काम हलवलेला नाही. एका आंदोलकाने चक्क सभापतींच्या आसनावर बसकण मारून आपल्या सहकाऱ्यांना आदेश द्यायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या संघर्षादरम्यान सुमारे 100 आंदोलक आणि 25 सुरक्षा रक्षक असे 125 जण जखमी झाले आहेत. आंदोलकांच्या खाद्यपदार्थांची सोय करण्यासाठी ट्रक संसदेच्या प्रवेशद्वारापाशी उभे करण्यात आले होते. या सर्व पदार्थांचा कचरा संसदेच्या प्रांगणात पसरला आहे.