बगदाद – इराण धार्जिण्या पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एका उमेदवाराचे नाव नामनिर्देशित केल्याच्या निषेधार्थ आज इराकच्या संसदेमध्ये कट्टरवादी गटाच्या सदस्यांनी संसदेच्या मुख्य सभागृहामध्ये घुसखोरी केली आणि इराणविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
या कट्टरवादी निदर्शकांमध्ये बहुसंख्य शिया मौलवी मुक्तादा अल सद्र यांचे समर्थक होते. हे निदर्शक संसदेतील टेबलांवर चढले आणि खासदारांच्या खुर्च्यांवर त्यांनी ठाण मांडले. त्यांनी हातात इराकचे राष्ट्रध्वजही घेतलेले होते. इराणविरोधी घोषणाही त्यांनी दिल्या. इराकमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 10 महिन्यांनी हे राजकीय नाट्य सुरू झाले आहे.
हे कट्टरवादी निदर्शक संसदेमध्ये घुसले तेंव्हा कोणीही खासदार संसदेमध्ये उपस्थित नव्हते. संसदेच्या इमारतीच्या आवारात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या निदर्शकांना किरकोळ विरोध केला. त्यामुळे हे निदर्शक सहजच संसदेच्या आवारात घुसू शकले.
इराकमधील कोऑर्डिनेशन फ्रेमवर्क ब्लॉक या इराण धार्जिण्या गटाने पंतप्रधानपदासाठी मोहम्मद अल सुदानी यांना आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ ही उग्र निदर्शने करण्यात आली. मोलवी सद्र यांच्या समर्थकांनी केलेली ही आतापर्यंतची दुसरी मोठी निदर्शने आहेत. आपल्या राजकीय विरोधकांना अस्तित्व दाखवून देण्यासाठी सद्र यांनी ही निदर्शने घडवून आणली आहेत. सद्र यांनी ट्विटवरूनच या निदर्शकांना माघारी येण्याचे आवाहन केल्यावर हे निदर्शक निघून गेले.