नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. पाच दिवसांपूर्वीच म्हणजे २१ जुलैला ईडीकडून त्यांची २ तासांपेक्षा जास्त चौकशी कऱण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईच्या विरोधात काँग्रेसकडून आज पुन्हा एकदा देशभर निर्देशने करण्यात येत आहे.
ईडीने सोनिया गांधींना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशी एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती. २१ जुलै रोजी सोनिया गांधींची दोन तासापेक्षा जास्त चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीदरम्यान ईडीने जवळपास २८ प्रश्न विचारल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये ईडीकडून राहुल गांधींची जवळपास ५० तास चौकशी करण्यात आली होती.
राहुल गांधींच्या चौकशीच्या वेळीही काँग्रेस नेते, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. जवळपास पाच दिवस काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात निर्देशने करण्यात आली होती. ईडीकडून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर करण्यात आलेले आरोप निराधार असून ही कारवाई सूडाचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.