पुणे : नदीपात्र तसेच सार्वजनिक जागेवर राडारोडा टाकण्यास मनाई आहे. मात्र, असे असतानाही नदीपात्रातील रस्त्याच्या कडेला खासगी जागेत टाकलेल्या हजारो टन राडारोड्याचा प्रकार दैनिक “प्रभात’ने समोर आणला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाच्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने महाराष्ट्र एज्युकेशन टेक्नीकल सोसायटीला तब्बल 75 हजार रुपयांचा दंड केला आहे. याशिवाय, या संस्थेस 24 तासांच्या आत राडारोडा उचलण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.दैनिक “प्रभात’ने “राडारोडा जीवावर’ या मथळ्याखाली खासगी जागेत टाकलेला राडारोडा नदीपात्रात धोकादायकरित्या आला असल्याचे वृत्त दिले होते. त्याची दखल घेत ही कारवाई केली आहे.
शहरातील राडारोड्यावर तसेच बांधकामांच्या खोदकामानंतर निघालेले दगड तसेच इतर साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून वाघोली येथील दगड खाणीत प्रकल्प उभारला आहे. मात्र, त्यानंतरही अनेकजण शहरात नदीपात्र, नाले तसेच महापालिकेच्या रिकाम्या जागेत राडारोडा टाकत आहेत. काहीजण आपल्या रिकाम्या जागा खासगी प्रकल्पांना राडारोडा टाकण्यासाठी भाडेकराराने देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत आहे. असाच प्रकार गरवारे महाविद्यालयाच्या शेजारी सेंट्रल मॉलच्या मागील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत सुरू आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून खोदकामात निघालेले दगड तसेच राडारोडा नदीकडेला असलेल्या जागेत टाकण्यात आला आहे. त्यातील मोठे दगड आता या जागेतून थेट नदीपात्रातील रस्त्यावर येत होते.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या ठिकाणी कारवाईसाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. मात्र, हा राडारोडा रात्री टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त राजेश गुर्रम यांच्या सूचनेनुसार, आरोग्य निरीक्षक गणेश खिरिड आरोग्य निरीक्षक बोर्डे यांनी ही कारवाई केली असल्याचे उपायुक्त राऊत यांनी स्पष्ट केले.